प्रतिनिधींची अनुपस्थिती; प्रात्यक्षिक दाखवणारे अभियंते आठ दिवस पुण्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत वापरण्यात येणारी व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रायल (व्हीव्हीपॅट) प्रणाली असलेली इलेक्ट्रोनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) पुण्यात दाखल झाली आहेत. ही यंत्रे भोसरी येथील गोदामामध्ये ठेवण्यात आली असून या यंत्रांच्या प्रत्यक्ष चाचणीसाठी आणि प्रात्यक्षिकासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र, इव्हीएम यंत्रांच्या तपासणीपाठोपाठ व्हीव्हीपॅट यंत्रांच्या तपासणीसाठी एकाही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीने अद्याप उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत राजकीय पक्ष उदासीन असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि उर्वरित जिल्ह्य़ातील दहा अशा एकूण एकवीस विधानसभानिहाय मतदारसंघांसाठी १६ हजार ७९० ईव्हीएम, नऊ हजार ७६२ कण्ट्रोल युनिट आणि नऊ हजार ७६२ व्हीव्हीपॅट यंत्रे बेंगळुरूमधून पुण्यात दाखल झाली आहेत. ही सर्व यंत्रे नवीन असून ईव्हीएमबाबतच्या तक्रारी, सूचना, हरकती लक्षात घेऊन ती तयार करण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट मतदान प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला त्याने कोणाला मतदान केले हे समजणार आहे.

व्हीव्हीपॅटमध्ये प्रिंटरप्रमाणे एक उपकरण ईव्हीएम यंत्राला जोडण्यात आले आहे. त्यामुळे मतदाराने ईव्हीएम यंत्रावर बटण दाबल्यानंतर एक चिठ्ठी बाहेर पडेल. त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्रम आणि निवडणूक चिन्ह दिसणार आहे. या प्रणालीमुळे ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप होऊ शकणार नाही, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या पाश्र्वभूमीवर भोसरी-मोशी रस्त्यावरील शासकीय गोदामात आगामी निवडणुकांसाठी शहरासह जिल्ह्य़ात वापरण्यात येणारी यंत्रे चाचणीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख पक्षांसह नोंदणीकृत इतर सर्व राजकीय पक्षांना, आमदार, खासदारांना जिल्हा प्रशासनाने पत्र पाठवले आहे. ईव्हीएम यंत्रांची चाचणी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली. तेव्हा आणि आता १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चाचणी मोहिमेला एकाही राजकीय पक्षाने उपस्थिती लावलेली नाही. प्रात्यक्षिक दाखवणारे अभियंते बेंगळुरूहून खास दोन महिन्यांसाठी पुण्यात आले असून ते आणखी केवळ आठ दिवस पुण्यात थांबणार आहेत, असेही सिंह यांनी सांगितले.

प्रात्यक्षिकात काय?

बेंगळुरू येथील भारत इलेक्ट्रोनिक कंपनीचे अभियंता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. मतपत्रिकांच्या सुमारे बाराशे प्रतिकृती छापण्यात आल्या असून त्याद्वारे सादरीकरण करण्यात येणार आहे. मतदानानंतर मतमोजणीच्या वेळी संबंधित यंत्र चालू आहे किंवा कसे, हे तपासण्यासाठी मतमोजणीच्या आधी सुरुवातीला आठ चिठ्ठय़ा बाहेर येतात व त्यानंतर मतांची माहिती कळते. या प्रात्यक्षिकासह यंत्रांची सर्व माहिती प्रात्यक्षिकात दिली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electronic voting machine
Show comments