Elevated Corridor Project at Palaspe: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये दररोज शेकडो नोकरदार ‘अप-डाऊन’ करत नोकरी व घरसंसार यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात. मुंबईत राहणं परवडत नाही आणि पुण्यातून येणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय अशा कात्रीत हा नोकरदार वर्ग सापडला आहे. त्यात या दोन्ही शहरांमधील ट्रॅफिकमुळे ही समस्या जास्तच उग्र झाली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील नोकरदार वर्गाला इतर शहरांत नोकरीसाठी जाण्याचे पर्याय मर्यादित झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पण मुंबई महानगर प्राधिकरण महामंडळ अर्थात MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या दोन शहरांमधील वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरेल, अशा तब्बल ११०० कोटींच्या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे.

फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण होणार प्रकल्प!

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि नव्याने तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंक अर्थात MTHL या दोघांना जोडणाऱ्या दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीसाठी पहिलं पाऊल टाकण्यात आलं असून जमीन अधिग्रहण व इतर बाबींची पूर्तता केली जात आहे. जवळपास दोन वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी २०२७ मध्ये हे दोन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणा-मुंबईतील नोकरदार वर्गासाठी लाभदायक ठरतील, असं डॉ. मुखर्जी यांचं मत आहे.

कसा आहे हा प्रकल्प?

MMRDA चा हा प्रकल्प असून गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या माध्यमातून हा प्रकल्प आकाराला येणार आहे. प्रकल्पाची नेमकी किमत ११०२.७५ कोटी इतकी आहे. या प्रकल्पात समाविष्ट दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर्समध्ये एकीकडे मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंकवरच्या चिरळेपासून गव्हाण फाट्यापर्यंतचा भाग एका कॉरिडॉरने जोडला जाईल. या कॉरिडॉरची लांबी ४ हजार ९५८ मीटर इतकी असेल. दुसरीकडे पळस्पे फाट्यापासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दुसऱ्या कॉरिडॉरने जोडला जाईल. या कॉरिडॉरची लांबी १७०० मीटर असेल. हे दोन्ही कॉरिडॉर प्रत्येकी ६ मार्गिकांचे असतील.

जेएनपीटी-पनवेल नॅशनल हायवे या महामार्ग क्रमांक ३४८ वर चिरळे ते गव्हाण फाटा यादरम्यान बांधल्या जाणाऱ्या कॉरिडॉर प्रकल्पात सर्व्हिस रोडच्या पुनर्बांधणीचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर बांधल्या जाणाऱ्या दुसऱ्या कॉरिडॉर प्रकल्पात या महामार्गाच्या रुंदीकरणाचाही समावेश आहे. हा प्रकल्प मोठा बदल घडवून आणणारा असून यामुळे प्रामुख्याने महामार्ग क्रमांक ३४८ वर होणारा वाहतूक खोळंबा टाळता येईल, असं डॉ. मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

वाहतूक खोळंबा कमी होणार!

“अटल सेतूला थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेशी जोडल्यामुळे या भागात महत्त्वाच्या ठिकाणी होणारा वाहतूक खोळंबा टाळता येईल. यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ चा समावेश आहे. मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान लोक आणि व्यवसाय कशा पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, याची पूर्ण व्यवस्थाच या प्रकल्पामुळे बदलून जाईल. नोकरदार वर्गाला मग पुण्यात राहूनही मुंबईत नोकरी करणं शक्य होईल. त्यामुळे लोकांना अधिकाधिक संधी उपलब्ध होऊन त्यातून त्यांचं जीवनमानदेखील सुधारेल”, असं डॉ. मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नमूद केलं.

Story img Loader