पुणे : बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच बनावट जामीनदार न्यायालायत हजर करुन सराइतांना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. बनावट जामीनदारांच्या टोळीला मदत करणाऱ्या दोन वकिलांसह अकरा जणांना अटक करण्यातल्ली असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनावट जामीनदार प्रकरणात काही महत्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर रविवारी रात्री उशीरा ॲड. अस्लम गफूर सय्यद (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि ॲड. सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली. यापूर्वी न्यायालयात बनावट जामीनादार म्हणून उपस्थित राहिलेले आरोपी संतोषकुमार तेलंग, संजय पडवळ, सुभाष कोद्रे, ज्ञानेश्वर शिंदे, सुजीत सपकाळ, भूपाल कांगणे, जितेंद्र यांना अटक करण्यात आली होती. गु्न्ह्यात अटक केल्याननंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येते. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना जामीनदार उपलब्ध होत नसल्याने आरोपींनी वकिलांशी संगमनत करुन बनावट जामीनदार न्यायालयात सादर केले. बनावट जामीनदार गु्न्हेगारांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. ही टोळी आधारकार्ड, शिधापत्रिका, सातबारा उतारे, तसेच संबंधित कागदपत्रे सादर करायची. शिधापत्रिकेवर बनावट सही, शिक्क्यांचा वापर करायचे. न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन कागदपत्रे मूळ असल्याचे भासवायचे. न्यायालयाची दिशाभूल करुन आरोपी गु्न्हेगारांना जामीन मिळवून द्यायचे.

बनावट जामीनदार उभे केल्याचे एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस आयु्क्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. संतोषकुमार तेलंग याच्यासह पाच बनावट जामिनदारांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आराेपी फरहान उर्फ बबलू शेख पसार झाला. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. शेख याला बनावट शिक्के ततयार करुन देणारा आरोपी दर्शन शहा यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून बनावट रबरी शिक्के, तसेच यंत्र जप्त करण्यात आले. शिधापत्रिका देणारे आरोपी पिराजी शिंदे, गोपाळ कांगणे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून ९५ शिधापत्रिका, ११ बनावट आधारकार्ड, मोबाइलस संच, दुचाकी जप्त करण्यात आली.

बनावट जामीनदार मुंबई, ठाणे, ग्रामीण भागातील

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी उपस्थित राहिलेले बनावट जामीनदार मुंबई, ठाणे, तसेच ग्रामीण भागातील असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना पैशांचे आमिष दाखवून न्यायालयात उपस्थित केले जात होते. त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे न्यायालायत सादर केली जायची, जामीनासाठी नातेवाईकांकडून घेण्यात आलेली रकमेपैकी काही रक्कम बनावट जामीनादारांना दिली जायची. बनाव जामीनदारांची प्रकरणे २४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त डाॅॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eleven people including two lawyers arrested for granting bail to criminals in jail by presenting fake guarantors pune print news rbk 25 amy