जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ११ मोबाईल सीमकार्ड घेतल्याचे उघड झाले आहे. या आरोपींची सीमकार्ड प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले.
फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद (वय ३८, रा. शक्रिवार पेठ.), इरफान मुस्तफा लांडगे (वय ३०, रा. मुकुंदनगर, अहमदनगर.) अशी या आरोपींची नावे आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड देणाऱ्या गणपत दामोदर गर्ग (वय ४२) याला यापूर्वीच अटक करण्यात आले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीतून फिरोज व इरफान यांचा सीमकार्ड प्रकरणात सहभाग स्पष्ट झाला होता. बॉम्बस्फोट प्रकरणात हे दोघे अटकेत असताना सीमकार्ड प्रकरणातही त्यांना वर्ग करण्यात आले.
आरोपींनी बनावट कागदपत्रं देऊन ११ सीमकार्ड घेतले होते. त्यातील दोन क्रमांकांची माहिती त्यांनी अद्याप दिली नाही. ही बनावट कागदपत्रे पोलिसांनी संबंधित कंपन्यांकडून मागितली आहेत. याबरोबरच सीमकार्ड प्रकरणात आणखी तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र,न्यायालयाकडून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा