पुणे : आरक्षणावरून मराठा आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर शनिवारी केला.
हेही वाचा >>> पिंपरी: अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची दोन पक्ष कार्यालये, शरद पवार गटाच्या कार्यालयाचं होणार लवकरच उद्घाटन!
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आंबेडकर यांची उलटतपासणी झाली. ॲड. रोहन जमादार, ॲड. प्रदीप गावडे आणि ॲड. मंगेश देशमुख यांनी आंबेडकर यांची उलटतपासणी घेतली. मराठा आणि ओबीसी समाजांत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती, परिषदेच्या प्रसारपत्रक, साहित्यांत असा उल्लेख का नव्हता?, असे सांगत ॲड. गावडे यांनी तुमचा हा दावा राजकीय हेतूने करत असल्याचे नमूद केले. त्यावर आंबेडकर यांनी राजकीय हेतूने हा दावा नसल्याचे आयोगासमोर स्पष्ट केले. त्यानंतर ॲड. जमादार आणि ॲड. देशमुख यांनी आंबेडकर यांची साक्ष घेतली.
हेही वाचा >>> डॉ. प्रदीप कुरुलकरची पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला; एटीएसला धक्का
एल्गार परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ते आजारी असल्याने आंबेडकर यांना अध्यक्ष करण्यात आले होते. या परिषदेवर नक्षलवाद आणि कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास प्रवृत केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांची या मुद्द्यावर उलटपासणी घेण्यात आली. आंबेडकर यांनी आयोगाला यापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप खोटा असून हिंसाचाराचे सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे असल्याचे नमूद केले आहे.
फडणवीस, मलिक, हक यांची साक्ष घ्या!
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक आणि तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची साक्ष झाल्यावरच आयोगाचे कामकाज पूर्ण होऊ शकेल. घटना नेमकी काय घडली, कशी घडली, कोणी घडविले याचा उलगडा होऊ शकणार आहे. त्यामुळे या तीन जणांची साक्ष नोंदविण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकबोटे, भिडे यांच्यावर हिंसाचाराचा ठपका ठेवत दोघांनाही अटक करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर एकबोटे यांना अटक झाली. मात्र, भिडे यांना अद्यापही अटक झालेली नाही, असे आंबेडकर यांनी उलटतपासणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.