प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पुण्यात प्रथमच आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तृत्वाची आणि विविध विषयांमधील अभ्यासाची चमक पक्षकार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाली. या दौऱ्यामुळे कार्यकर्ते चांगलेच प्रभावित झाले आहेत. विकास आराखडय़ाबाबत जे ‘प्रेस’ ला सांगितले आहे, त्याप्रमाणेच पुढील आंदोलन पार पडले पाहिजे आणि ते शहर भाजप म्हणून एकत्रितपणे झाले पाहिजे, असा आदेशही फडणवीस देऊन गेले आहेत.
गेल्या महिन्यात सहजीवन व्याख्यानमालेसाठी फडणवीस पुण्यात आले होते. मात्र, रविवारचा पूर्ण दिवस त्यांनी शहर भाजपसाठी दिला. पुण्यात शनिवारी रात्री आल्यापासून ते रविवार रात्रीपर्यंत त्यांचे विविध कार्यक्रम योजण्यात आले होते आणि त्यात त्यांच्या गुणांचे विविध पैलू प्रकट झाले. मुख्य म्हणजे, यापुढे विकास आराखडय़ाच्या विरोधात जे आंदोलन आपण जाहीर केले आहे, ते शहर भाजप म्हणूनच झाले पाहिजे आणि त्यासाठीचे कार्यक्रमही शहराने आयोजित करावेत, असे या भेटीत फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नगरसेवकांच्या बैठकीपूर्वी त्यांनी शहराच्या विकास आराखडय़ाची तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर बैठकीतही आराखडय़ाच्या विषयावर नगरसेवकांच्या सूचना ऐकतानाच फडणवीस यांनी उपयुक्त माहितीही दिली. शहरांचे नियोजन कशा पद्धतीने केले जावे, शहरांचे प्रश्न काय आहेत, त्यावर उपाय कोणते आहेत, महापालिकांपुढील आव्हाने कोणती आहेत आदी अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास आणि त्यासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेली आकडेवारी यामुळे पक्षपदाधिकारी तसेच नगरसेवक प्रभावित झाले. नागपूरचे महापौर म्हणून फडणवीस यांनी काम केले असल्यामुळे शहरांच्या प्रश्नांची अचूक जाण त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी व्यक्त होत होती. त्याबरोबरच संघटनात्मक कामाबाबतही त्यांनी योग्य तो संदेश पदाधिकाऱ्यांना दिला.
विकास आराखडा या विषयावर पत्रकारांबरोबर आयोजित चर्चेत त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्याबाबत सांगितले होते. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर प्रथमच पक्षातील सर्व गटांचे आमदार आणि पदाधिकारी एकत्र आल्याचे चित्र यावेळी पत्रकारांना दिसले. आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर तसेच ज्येष्ठ नेते अनिल शिरोळे, योगेश गोगावले, दिलीप कांबळे तसेच शहराचे सर्व पदाधिकारी या चर्चेत उपस्थित होते. त्यावेळीही फडणवीस यांचा शहर नियोजन या विषयातील अभ्यास दिसून आला.
वसंत व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्रापुढील आव्हाने’ या विषयावर त्यांचे ऐंशी मिनिटांचे भाषण झाले. प्रामुख्याने शहर नियोजन, विकास आराखडा, शिक्षण, दरडोई उत्पन्न, जलनीती, मानवविकास, रोजगाराच्या संधी, भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था, ई-गव्हर्नन्स या मुद्यांवर मालेत झालेले फडणवीस यांचे भाषणही प्रभावी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा