युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत आता ई मेल पत्ता, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) त्यासाठी पुढाकार घेतला असून, सुरुवातीला ५० सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल (नि.) ए. के. नाथ यांनी ही माहिती दिली. युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे २८ मार्चला साजरा करण्यात येतो.
सध्या इंटरनेटवर ई मेल, संकेतस्थळांचे पत्ते केवळ इंग्रजीत आहेत. मात्र देशभरात विविध भाषा असल्याने इंटरनेट बहुभाषिक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सी-डॅककडून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. नाथ म्हणाले, की ‘डॉट भारत’ हे डोमेन नोंदणीकृत करण्यात आले आहे. सुरुवातीला पन्नास सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य भाषांचा विचार करण्यात येईल. प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल, संकेतस्थळ पत्ता उपलब्ध होण्यामध्ये विविध भागधारकांचा सहभाग आहे.