पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाईं’ मंडळींकडून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले तोडफोड आणि राडेबाजीचे सत्र अजूनही सुरूच आहे. गुरूवारी रात्री पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका तडीपार गुंडाने त्याच्या टोळक्यासमवेत प्रचंड दहशत माजवली. गाडय़ांची व घरांची तोडफोड, दगडफेक करतानाच रस्त्यावरील नागरिकांना मारहाण केली. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच गल्लीबोळातील या छोटय़ा-मोठया ‘भाईं’चे शहरात ‘गुंडाराज’ तयार झाले आहे.
हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर बसून येणारे टोळके व त्यांचे तोडफोड करून निघून जाणे, हे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मारहाण केली जाते. रस्त्यावर लावलेली वाहने फोडली जातात, अशा घटना सातत्याने सुरू आहेत. नऊ ऑक्टोबरला दोन गटाच्या वादातून आकुर्डीतील एका टोळक्याने भोसरीत सशस्त्र हल्ला चढवला, त्या वेळी त्यांनी गाडय़ांची, दुकानांची तोडफोड करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही मारहाण केली. २३ नोव्हेंबरला एकाच दिवशी, काळेवाडीत बेकरीत घुसून तोडफोड, डीलक्स सिनेमा चौकात दगडफेक आणि चिंचवडमध्ये तोडफोड झाल्याची नोंद आहे. त्यानंतर, शाहूनगर व संभाजीनगरमध्ये दुचाकीवर बसून आलेल्या टोळक्याने चालत्या गाडय़ांवरून मोटारी फोडल्या, तसेच दुकानांची तोडफोड केली. पोलिसांच्या निष्क्रियतेवर चौफेर टीका झाली, प्रसारमाध्यमांनीही झोडपून काढल्याने पोलिसांनी कारवाईचा ‘देखावा’ केला आणि पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयांवर धडक मोहीम राबवून ५८ टवाळखोरांना ताब्यात घेतले. मात्र, तोडफोडीच्या घटना सुरूच होत्या, गुरूवारी त्यावर कळस चढला. चिंचवड स्टेशन येथील एक तडीपार गुंड अविनाश पवार व त्याचे हत्यारबंद साथीदार आनंदनगर झोपडपट्टीत शिरले व त्यांनी तोडफोड सुरू केली. दुचाकी, तीनचाकी गाडय़ा फोडल्या, नागरिकांना मारहाण केली. दगडफेक केली, त्यात अनेक जखमी झाले. बराच वेळ राडा करून ते निघून गेले. संतापलेले नागरिक रस्त्यावर आले आणि महामार्ग रोखला. उशिरा पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
..‘त्या’ दारूडय़ांना पोलिसांचे अभय?
संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयासमोरील नागरी वस्तीत पालिकेच्या दोन सभागृहांमध्ये, तसेच टपऱ्यांच्या आडोशात बसणाऱ्या दारूडय़ा व गांजा पिणाऱ्या उपद्रवी युवकांनी गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. सुरक्षारक्षक बघ्याची भूमिका घेतात. भीतीने कोणी काही बोलत नाही. पोलिसांना सांगूनही कारवाई होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांची मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा