पुणे : पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीनप्रसंगी आता तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे. महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू केली जाणार आहेत. या माध्यमातून वाहनचालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील. ९५ किलोमीटरच्या हा महामार्गावर दर दोन किलोमीटरवर एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार आहे.
मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी सुरक्षा सुविधा सहजपणे आणि तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही सोय करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी दूरसंचार क्षेत्रातील ‘वी’ कंपनीने एक विशेष करार केला आहे. त्याअंतर्गत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या करारानुसार वी कंपनी सर्व केंद्रांना नेटवर्क देणार आहे. दर दोन किमीवर ही दूरध्वनी केंद्रे उभारली जाणार असून त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे प्रवाशांना शक्य होईल.
हेही वाचा >>>‘मार्ड’चा संप मागे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय
प्रत्येक आपत्कालीन दूरध्वनी केंद्रावरील नेटवर्क सुरळीत ठेवण्याची व्यवस्था ‘वी’ कंपनी करेल. नेटवर्कमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी महामार्ग पोलीस नियंत्रण कक्ष आणि आपत्कालीन दूरध्वनी केंद्र अशी दोन्हीकडे ‘वी’ कंपनीची सेवा असेल. उपकरणांची देखभाल करून तसेच प्रवाशांच्या चौकशी आणि तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे काम रस्ते विकास महामंडळ करणार आहे.पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर दर दोन किलोमीटरवर आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे उभारण्यात येतील. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देत आहोत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील प्रवास सुरक्षितपणे व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. आपत्कालीन दूरध्वनी केंद्र हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. – राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ