पुणे : प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाच्या घराच्या शिफ्टिंगसाठी बोलावलेल्या खासगी कामगाराचे साहित्य ने-आण करताना तिजोरीतील सोन्याचे बिस्कीट पाहून डोळे गरगरले. त्याने नजर चुकवून एक कोटी ६० लाख रुपये किमतीच्या वीस बिस्किटांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून या कामगाराला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीची बिस्किटे जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.

याप्रकरणी गौतम सोळंकी (वय ५२, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नेताजी अरुण जाधव (वय ३३, रा. निगडी) याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. गौतम सोळंकी हे सराफी व्यावसायिक असून, त्यांची मध्य भागात सराफी पेढी आहे. भावासमवेत ते हा व्यवसाय करतात. दरम्यान, त्यांनी टिळक रस्त्यावर नवीन सदनिका घेतली आहे. यामुळे ते शुक्रवार पेठेतून नवीन ठिकाणी घराचे शिफ्टिंग सुरू होते.

साहित्य ने-आण करण्यासाठी नेताजी जाधव याला कामासाठी बोलावले होते. सोळंकी यांची वडिलोपार्जित तिजोरी आहे. तिजोरीत त्यांच्या लहान भावाने सोन्याचे बिस्कीट ठेवले होते. याबाबत त्यांना कल्पना नव्हती. साहित्याची ने-आण करताना तिजोरी लिफ्टमध्ये जात नसल्याने त्याचा दरवाजा काढण्यात आला होता. तेव्हा छोट्या कप्प्यात बिस्कीट असल्याचे नेताजी याला दिसले. त्याने तक्रारदारांच्या कुटुंबीयाची नजर चुकवून १ कोटी ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट चोरून पोबारा केला.