हल्ली व्हॉट्सअॅपचं वेड प्रचंड वाढलंय, असं आपण अनेकदा ऐकत असतो. मग ते नुकत्याच वयात आलेल्या मुलांमध्ये असो, तरुणांमध्ये असो, महिला वर्ग किंवा पुरुषांमध्ये असे किंवा मग अगदी वयोवृद्धांमध्ये असो. सगळ्यांचेच व्हॉट्सअॅपवर सगळ्याच प्रकारचे ग्रुप असल्याचं पाहायला मिळतं. मग या ग्रुपचे विषय, चर्चा, मेसेज, त्यावरचे रिप्लाय अशा सर्वच कारणांवरून थेट वैयक्तिक संबंधांमध्येही ताण निर्माण झाल्याची अनेक प्रकरणं आपल्या आसपास दिसून येतात. तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडला असून एका कर्मचाऱ्यानं कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून आपल्याला काढलं, म्हणून चक्क बॉसला बांबूच्या काठीनं मारहाण केल्याचं उघड झालं आहे.
वाद वाढला, थेट पोलिसांत तक्रार!
हा सगळा प्रकार १ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा ते १ च्या दरम्यान चंदन नगरमध्ये जुना मुंढवा रोड परिसरात घडला. या प्रकरणी लोहगावच्या खांडवा नगर परिसरातील ३१ वर्षीय अमोल यांनी चंदन नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सत्यम नावाच्या व्यक्तीविरोधात त्यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. ही कंपीन अमोल यांच्या मालकीची आहे. सत्यमविरोधात अनेक ग्राहकांनी अमोल यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्याच्या वर्तनावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यासंदर्भात व्यवस्थापनानं सत्यमला फोनद्वारे संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यानं त्याला प्रतिसाद दिला नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अमोल यांनी सत्यमला ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून काढलं. पण यामुळे सत्यम संतप्त झाला. आपल्याला ग्रुपमधून काढलंच कसं? अशी विचारणा करत तो थेट ऑफिसात दाखल झाला. त्यानं थेट अमोल यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याच्या हातात बांबूची काठी होती. त्यानं आत शिरताच अमोल यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच, त्यांच्या आयफोनचंही नुकसान केलं.
या सगळ्या प्रकारानंतर अमोल यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सत्यमविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात चंदन नगर पुढील तपास करत आहेत.