नागरवस्ती विभागाचे नियमित काम सांभाळून उर्वरित वेळात अनेकविध सामाजिक कामे केल्याबद्दल आणि या कामांचे कौतुक वृत्तपत्रांमध्ये झाल्याबद्दल महापालिका प्रशासनाने एका समूहसंघटिकेवर कारवाई केली असून कामावरून कमी करण्याबरोबरच त्या बातम्या छापून आल्याबद्दल त्यांचा पगारही कापण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
नागरवस्ती विभागात गेली बारा वर्षे समूहसंघटिका म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गीता मनोज मोहोरकर यांनी त्यांच्यावरील अन्यायाबाबत शुक्रवारी आयुक्तांकडे तक्रार केली असून विशेष म्हणजे पुण्यातील ८२ समूह संघटिकांमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दलचा पुरस्कार मोहोरकर यांना गेल्या वर्षी आयुक्तांच्याच हस्ते देण्यात आला होता. मोहोरकर गेली अनेक वर्षे पर्वती, जनता वसाहत येथे समूह संघटिका म्हणून काम करत होत्या. त्यानंतर धायरी येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेनी दिलेली सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण करतानाच सायंकाळच्या वेळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले होते.
परिसर स्वच्छता, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, कायदा मार्गदर्शन, व्यवसाय गट स्थापना आदी मोहोरकर यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमांना वृत्तपत्रांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिली तसेच त्यांचे त्याबद्दल वेळोवेळी कौतुकही होत होते. त्यामुळे अशाप्रकारे तुमच्या बातम्या आल्यास कारवाई करावी लागेल, असे त्यांना नागरवस्ती विकास योजनेतील त्यांचे वरिष्ठ पांडुरंग महाडिक यांनी सांगितले. एवढय़ावर न थांबता वेळोवेळी मानसिक छळ करून मे महिन्यात मोहोरकर यांनी राबवलेल्या उपक्रमांच्या दोन बातम्या आल्याबद्दल त्यांचा दोन दिवसांचा पगारही कापण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कराराचे नूतनीकरण न करता त्यांना गेल्या महिन्यात  कामावरून कमी करण्यात आले. महाडिक यांनी विविध बचत गटांकडून मोहोरकर यांच्या विरोधात खोटे तक्रार अर्ज लिहून घेतले असून तसे अर्ज देणाऱ्या महिलांनीच ही वस्तुस्थिती आता उघड केली आहे.
अशा प्रकारे महिला सक्षमीकरणाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या एका महिलेचेच खच्चीकरण वरिष्ठांकडून होत असल्याच्या प्रकाराबद्दल मोहोरकर यांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे.
म्हणून झाली कारवाई..
– एकशेचाळीस बचत गट स्थापन केले
– बारा वर्षांत शेकडो उपक्रम राबवले
– बचत गटांतर्फे स्वस्त धान्य दुकाने सुरू केली
– पोलीस दक्षता समितीतही प्रभावीरीत्या काम केले
– उत्कृष्ट कार्याबद्दलचा पुरस्कार मिळवला