पुणे : खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीने कंपनीतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रारही दिले होती. मात्र, समितीने तरुणीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. आरोपी व्यवस्थापकाने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.

याप्रकरणी व्यवस्थापक शुभम दुबे (वय ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम दुबे एका प्रसिद्ध खासगी वित्तीय संस्थेत व्यवस्थापक आहे. येरवडा भागातील आयटी पार्क परिसरात कंपनीचे कार्यालय आहे. तरुणी वित्तीय संस्थेत कर्मचारी आहे. तरुणी प्रसाधनगृहात जाताना दुबे तिचा पाठलाग करायचा. प्रसाधनगृहाजवळ त्याने तरुणीला अडवून असभ्य वर्तन केले. त्याने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली.

हेही वाचा >>>ही कसली सांस्कृतिक राजधानी?

तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर तो तिला त्रास देत होता. त्याच्या त्रासामुळे तरुणीने वित्तीय संस्थेतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली. मात्र, समितीने तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी दुबेने तरुणीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अखेर तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर-पाटील तपास करत आहेत.