पुणे : खडकीतील दारुगोळा कारखान्यातून काडतुसे चोरून नेणाऱ्या कर्मचाऱ्याला गुप्तचर यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने पकडले. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून २२ काडतुसे जप्त करण्यात आली.
गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी ररस्ता चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत दारुगोळा कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुगोळा कारखान्यातून काडतुसे चोरुन बाहेर नेण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी याबाबतची दारुगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांना दिली होती. खडकी पोलीस ठाण्यातील अधिकाऱी आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी वेशांतर करुन दारूगोळा कारखान्यातील प्रवेशद्वार क्रमांक १२ जवळ सापळा लावला.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणेश प्रवेशव्दारातून बाहेर पडला. पोलीस आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली, तसेच दुचाकीची डिकीची तपासणी करणण्यात आली. डिकीत काडतुसे सापडली. पोलिसांनी डिकीतून २२ काडतुसे जप्त केली.
आरोपी गणेशची चौकशी करण्यात आली. तेव्हा तो काडतुसे चोरून बाहेर नेत असल्याची माहिती मिळाली. गणेशने यापूर्वी किती वेळा काडतुसे चोरून नेली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गणेशने चोरलेल्या काडतुसांची कोणाला विक्री केली का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. भारतीय हत्यार कायदा कलम, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चौगले तपास करत आहेत.