अडचणीत असलेल्या रुपी को-ऑप. बँकेचे अस्तित्व आणि पुनरुज्जीवन हे सर्व प्रकारच्या खर्चकपातीवर अवलंबून असल्याने कर्मचाऱ्यांच्या नव्या करारासंदर्भात बँकेच्या चारही कामगार संघटनांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रस्तावित बदल सुचविण्यात आले असून आता २१ दिवसांत कर्मचारी संघटना आपली भूमिका कळवेल, अशी अपेक्षा असल्याचे बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी सोमवारी सांगितले.
बँकेतील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे बँक पूर्णपणे सुरू असून संपूर्ण उत्पन्न येत असल्याच्या काळापासूनचे आहे. मात्र, बँक अडचणीत आल्यानंतर पाठपुरावा करूनही थकित कर्जवसुली होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांचे काम हे शंभर टक्के न राहता जवळपास शून्य टक्के राहिले आहे. बहुतांश शाखांमध्ये कामाचा बोजा आणि मिळणारे वेतन हे उलट झाले आहे. या साऱ्याचा विचार करून प्रशासकीय मंडळाने चारही कर्मचारी संघटनांना ३० डिसेंबर रोजी नोटीस पाठविली आहे. त्यावर संघटनांनी २१ दिवसांत उत्तर न दिल्यास हा करार अस्तित्वात येईल. मात्र, संघटनांनी न्यायालयात दाद मागितल्यास कायदेशीर पद्धतीने मार्ग काढण्यात येईल, असे डॉ. अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. अरिवद खळदकर आणि सुधीर पंडित हे प्रशासकीय मंडळाचे सदस्य या वेळी उपस्थित होते.
नव्या करारातील प्रस्तावित बदलामध्ये विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एकूण सेवकसंख्या ६० टक्क्य़ांनी कमी केली जाईल. सेवकांचे सध्याचे पगार आणि भत्त्यांमध्ये ५० टक्के कपात करण्याबरोबरच सरकता महागाई भत्ता गोठविला जाईल. रजा कमी करण्याबरोबरच अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा ४२ दिवसांपर्यंत असेल. वैद्यकीय भत्ता, टेलिफोन भत्ता आणि वार्षिक सवलत या सुविधा बंद करून वार्षिक बोनस हा कायद्यानुसार दिला जाईल. सर्व प्रकारच्या सेवक कर्जसुविधा स्थगित केल्या जातील, या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सेवक संख्या आणि सेवक खर्च कमी करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. सेवक कराराची मुदत २००० मध्ये संपुष्टात आली असून नव्या करारासंदर्भात ही नोटीस पाठविण्यात आली असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.
..तर कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती घेण्याची हमी संघ घेईल
रुपी बँकेचे प्रशासन बँकेच्या विलीनीकरणाची आणि सर्व ठेवीदारांच्या ठेवींच्या सुरक्षिततेची लेखी हमी घेण्यास तयार असतील, तर त्यासाठी आवश्यक तेवढय़ा कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती घेण्याची जबाबदारी बँक कर्मचारी संघ घेईल, असे संघाचे सरचिटणीस विद्याधर अनासकर यांनी कळविले आहे. स्वेच्छानिवृत्तीची योजना ४५ वर्षांच्या आतील कर्मचाऱ्यांनाही त्यांचे वय ४५ समजूनच लागू करण्याची विनंती लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार बँकेस कोणताही जादा आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र, या प्रस्तावास प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. बँकेच्या सर्व सेवकांची आणि संघटनांची शनिवारी (९ जानेवारी) जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे, असेही अनासकर यांनी कळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा