वैद्यकीय अधीक्षक पदासह ५१८ पदे रिक्त

पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधीक्षक पदासह ५१८ वेगवेगळी पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय अधीक्षक पदाबरोबरच पहिल्या वर्गातील १४३, दुसऱ्या वर्गातील ३४, तिसऱ्या वर्गातील १८४ तर चौथ्या वर्गातील सुमारे १५७ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका बाजूला पुणे शहर स्मार्ट सिटी होण्याच्या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे, तर दुसऱ्या बाजूला शहराची आरोग्य यंत्रणाच कोलमडल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखाचे म्हणजेच वैद्यकीय अधीक्षकाचे पद अनेक वर्ष रिक्त असून त्या जागी प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या डॉ. एस. टी. परदेशी यांच्या सेवानिवृत्तीनंतर अद्यापही त्या जागेवर आरोग्य प्रमुख नेमण्यात आलेला नाही. आरोग्य प्रमुख आणि आरोग्य यंत्रणेतील इतर अनेक पदांवर तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालये किंवा ससून रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. वर्ग १ मधील मेंदू विकार तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, आयसीयू फिजिशियन, अस्थिविकार तज्ज्ञ, दंतशल्यचिकित्सक, फिजिशियन अशा अनेक महत्वाच्या पदांवर

पुरेशा संख्येने डॉक्टर कार्यरत नाहीत. यापैकी अनेक पदांच्या मान्यताप्राप्त संख्येपैकी एकही पद भरलेले नाही. वर्ग २ प्रकारातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा किंवा रक्तपेढी सहायक, इ. सी. जी. तंत्रज्ञ, कार्डिओग्राफर, क्ष—किरण तंत्रज्ञ अशा पदांवरही पुरेशी कर्मचारी भरती झालेली नाही. वर्ग ३ प्रकारातील शस्त्रक्रिया गृह सहायक, मेडिकल रेकॉर्ड

कीपर, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य समन्वयक अशी अनेक पदेही दीर्घ काळ रिक्तच आहेत. वर्ग १ ते वर्ग ४ या प्रकारातील ५८ पदांवर मान्यता प्राप्त पदसंख्येपैकी एकही पद भरले गेलेले नाही.

शासनाशी पत्रव्यवहार

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले म्हणाल्या,की अनेक पदांच्या भरतीसाठी शासन निर्णयांतील तरतुदींचा अडथळा होत आहे. आरोग्य, अग्निशामक दल आणि शिक्षण विभागातील पदांच्या भरतीसाठी शासननिर्णयाचा अडथळा नको अशी मागणी करणारे पत्र आम्ही शासनाला दिले आहे. मात्र त्यावर कोणतेही उत्तर शासनाकडून मिळालेले नाही. महापालिकेसाठी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी हवा म्हणून दोन वेळा भरती प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र सक्षम उमेदवार मिळाला नसल्याने ही भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्यात येणार आहे.

 

पदाचे नाव            मान्यताप्राप्त जागा      रिक्त जागा

स्त्रीरोग तज्ज्ञ          १५ जागा              १५ ही जागा रिक्त

बालरोग तज्ज्ञ         १३ जागा              १२ जागा रिक्त

बधिरीकरण तज्ज्ञ       ५ जागा             ५ ही जागा रिक्त

बालशल्यविशारद       ५ जागा             ५ ही जागा रिक्त

Story img Loader