लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत ४४ झोपडपट्ट्यांमधील ३१ हजार ४०० हून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. कौशल्यानुसार युवकांना रोजगार देण्यात येणार आहे.
सर्वेक्षणामुळे शहरातील युवकांची लोकसंख्या, कौशल्ये आणि करिअर उद्दिष्टांची माहिती महापालिकेला मिळणार आहे. त्या आधारे कौशल्यविकास आणि रोजगार कार्यक्रम आखण्यात येणार आहे. तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच तरुणांसाठी जागरूकता मोहीम, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि शहरातील उद्योगांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यातही मदत होणार आहे. कौशल्य विकास कार्यक्रम, आयटी, आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्रातील उद्योगांच्या गरजांनुसार विशेष अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. करिअर मार्गदर्शन सत्रांमध्ये युवकांना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
आणखी वाचा-बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
- ४४ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण
- ३१ हजार ४०० कुटुंबांची माहिती संकलित
- १८ ते ३५ वयोगटातील १८ हजार युवक
- दहावीपर्यंतचे शिक्षण अपूर्ण असलेले २४ टक्के तरुण
- बारावी उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ३४ टक्के
- दोन टक्के युवक पदविका, पदव्युत्तर पदवीधारक
- व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेले २१ टक्के युवक
सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमुळे शहरातील तरुणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे. भविष्यातील उपक्रमांना प्रभावी स्वरूप देण्यासाठी हे निष्कर्ष उपयुक्त ठरले आहेत. तरुणांच्या कौशल्यविकास, करिअर मार्गदर्शन आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.