पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार १८ ते ४० वयोगटातील प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पाशी निगडित रोजगार देण्यासाठी खास संकेतस्थळ निर्मितीचे काम सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या मदतीने हे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे.
विमानतळ प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या ठिकाणी बहुद्देशीय माल वाहतूक आणि साठवणूक केंद्र (मल्टी मॉडेल हब लॉजिस्टिक पार्क) प्रस्तावित करण्यात आले आहे. भूसंपादनाच्या आधीची पूर्वतयारी म्हणून प्रशासनाने कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने खास संकेतस्थळ तयार करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा >>> पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश, आदेशाचा भंग केल्यास कारवाई
याबाबत बोलताना विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘विशेषतः बाधित कुटुंबांमधून १८ ते ३५ वयोगटातील युवकांची स्वतंत्र माहिती या संकेतस्थळामध्ये संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. बाधित युवकांना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूसंपादनाची अधिसूचना निघताच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतची पूर्वतयारी करण्यात आली आहे.
एमआयडीसीने तयार केलेल्या अहवालानुसार विमानतळाच्या जागेवर व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसन हेतू (इन्टेन्शन ऑफ डेव्हलपमेंट – आयओडी) म्हणून ही जागा सर्वोत्तम आहे. बहुउद्देशीय मालवाहतूक व साठवणूक केंद्रासाठी कोणतीही हरकत नाही. त्यामुळे विमानतळाबरोबरच उपाहारगृह, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ निर्मिती (केटरिंग), वाहनतळ, गोदाम, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, व्यापार संकुले आदी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्त्रोतांच्या माध्यमातून रोजगार निर्माण होणार आहेत. या व्यवसायांमध्ये या बाधितांना समाविष्ट केले जाणार आहे.’
हेही वाचा >>> पुण्यातील कार्यालयाची जागा अॅमेझॉनकडून भाड्याने, आर्थिक मंदीचा फटका
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात बाधित होणाऱ्या गावांचे गट निहाय सर्वेक्षण क्रमांकांनुसार क्षेत्रफळ आणि बाधित कुटुंब, कुटुंबातील व्यक्तींची संख्या निश्चित करण्यात आली आहे. टीसीएसने बनविलेल्या संकेतस्थळामध्ये युवकांची शैक्षणिक पात्रता, आवड-निवड आदी निकषांच्या माध्यमातून माहिती संगणकीकृत करण्यात येत आहे. भूसंपदानाची अधिसूचना जाहीर होताच युवकांच्या सहमतीने त्यांना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आणखी विशेष कल्याणकारी योजना राबवून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेतले जाणार आहेत, असेही विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना जाहीर करण्याबाबत स्थानिक प्रशासकीय पातळीवर वेगाने काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत भूसंपादन अधिसूचना निघेल.