दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या महिलांनी शरीरविक्रय करू नये यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘विधायक’च्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये काम करणाऱ्या वंचित विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांसह गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा संकल्प करण्यात आला.
विधायक हे शहरातील मंडई, तुळशीबाग, नारायण पेठ, शनिवार पेठे, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ आणि परिसरातील ४० गणेश मंडळांचा समावेश असलेले सामाजिक व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. विधायकच्या माध्यमातून लातूर भूकंपाच्या वेळी विस्थापित झालेल्या महिलांना आर्थिकृष्टय़ा सक्षम करून त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलली होती. आनंद सराफ, शिरीष मोहिते, पराग ठाकूर यांनी वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले यांच्यासमवेत शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची बैठक घेतली. यंदा राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन विस्थापित झालेल्या महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.
लिज्जत पापड आणि लोकसेवा प्रतिष्ठान यांनी या स्थलांतरित महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले असल्याचे शिरीष मोहिते यांनी सांगितले. अन्य काही व्यावसायिकांशी संपर्क साधून सिट कव्हर्सची शिलाई करण्याच्या माध्यमातून या महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न असल्याचे पराग ठाकूर यांनी सांगितले. शरीरविक्रय करण्याचा व्यवसाय सोडण्याची इच्छा असलेल्या महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विधायकच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती आनंद सराफ यांनी दिली. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य आणि पैसे जमा केले असल्याचे मीना कुर्लेकर आणि मीनाक्षी नवले यांनी सांगितले.
उदरनिर्वाहासाठी चांगल्या घरातील महिलांनी शरीरविक्रय करू नये असाच शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचा प्रयत्न असतो. त्यातूनही एखादी महिला या व्यवसायामध्ये आलीच तर, शरीरविक्रय करणाऱ्या महिला त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करतात, अशी माहिती या महिलांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली. वीस वर्षांपूर्वी दुष्काळामध्ये मी या व्यवसायाकडे नाईलाजाने वळले. अन्य महिलांनी या व्यवसायामध्ये येऊ नये यासाठी येथे मिळालेले पैसे मी घरी पाठवीत असे, असे हेमा सोनावणे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा