पिंपळे निलख येथील एका रस्त्यावर निवृत्त माजी सहपोलीस आयुक्ताकडून अतिक्रमण करण्यात आले असून सातत्याने तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक विलास नांदगुडे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
पोलीस खात्यात सेवेत असतानाच या अधिकाऱ्याने पिंपळे निलख येथे बंगला बांधला होता. त्यावेळी बंगल्याच्या बाजूला दोन राहुटय़ा बांधून घेतल्या होत्या. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्या राहुटय़ा तशाच ठेवण्यात आल्या आहेत. रस्त्यावरच असलेले हे अतिक्रमण काढण्याची मागणी पाच वर्षांहून अधिक काळ आपण करत आहोत. मात्र, अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कारवाई करण्याऐवजी त्या अतिक्रमणाला संरक्षण देत असल्याची तक्रार नांदगुडे यांनी केली. हे अतिक्रमण काढण्याची कारवाई आयुक्तांनी करावी व कायदा सर्वासाठी सारखाच असतो, असा संदेश कृतीतून द्यावा, अशी मागणी नांदगुडे यांनी केली. या संदर्भात, प्रभाग अधिकारी पांडुरंग झुरे यांच्याकडे विचारणा केली असता कार्यकारी अभियंता दांगट यांच्याकडे हा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. दांगट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता. त्यामुळे प्रशासनाची बाजू समजू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा