प्राण्याचे रूपांतर माणसात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कृती. सर्व संस्कृतींचा पाया प्रेम असते. त्यामुळे प्रेमावर उभी असलेली संस्कृतीच यापुढे टिकेल, असे विचार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपली संस्कृती कोणती?’ या विषयावरील परिसंवादात कसबे बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, लेखिका अश्विनी धोंगडे यांनी सहभाग घेतला.
कसबे म्हणाले की, भटका माणूस स्थिर झाला तेथून संस्कृतीला सुरुवात झाली. नृत्य, गायन, संगीत आदी संस्कृतीची अंग आहेत. ती माणसाला प्राण्याचा माणूस करते. संस्कृतीचा प्राथमिक काळात धर्माशी संबंध नव्हता. पुरुषप्रधान संस्कृती आल्यानंतर संस्कृतीची सर्व अंग बदलली. त्यानंतर धर्माने संस्कृतीवर आक्रमण केले. सर्व संस्कृतीचा पाया प्रेम असते. जगण्याच्या संघर्षांतून हे प्रेम निर्माण होते. प्रेमावर उभी असणारी संस्कृतीच यापुढे टिकणार आहे व तीच आपली संस्कृती असेल. प्रेमाच्या जागृतीसाठीही सध्या प्रबोधनाची गरज आहे. ते होणार नाही तोवर जातीव्यवस्था जाणार नाही.
जोशी म्हणाले, शिक्षणाच्या बाजारीकरणातून मूळ संस्कृतीचा पाया बिघडला. परिवर्तन व्हावे व ते वर्तनात दिसावे, या पद्धतीचे शिक्षण असावे. संस्कृती परवेदनेतून निर्माण होते. संस्कृती ही अष्टांग असते. तिची सर्व अंगे व्यवस्थित राहिली, तर संस्कृतीचे जतन होईल.
धोंगडे म्हणाल्या की, संस्कृतीने काही जाती-जमातींना बाजूला टाकले, तसे स्त्रियांनाही बाजूला टाकले. स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचा विचार केलेला नाही. समाजात तिची प्रतिमा दुबळी केली गेली. स्त्री हे धर्माचे वाहक म्हणून वापरले जाते, हे अत्यंत धोकादायक आहे. स्त्रियाही आज स्वयंकेंद्रित होत असून, समाजापासून तुटत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा