लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: चतुःशृंगी हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ‘एमपीएडीए’नुसार केलेली ही नववी कारवाई आहे. रणजित रघुनाथ रामगुडे (वय २०, रा. सुतारवाडी) असे स्थानबद्धतेची कारवाई केलेल्या सराइताचे नाव आहे.
सराईत रणजित याने साथीदारांसह चतुःशृंगी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धारदार जिवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, वाहनांची तोडफोड, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्यापासून जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
आणखी वाचा-पुणे: धान्य गोदामाच्या जागेचा तिढा कायम
याप्रकरणी प्राप्त प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करून सराईत रणजित याच्याविरुद्ध एमपीएडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहेत. सराईताला स्थानबद्ध करण्यासाठी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी कामगिरी पार पाडली.
आतापर्यंत नऊ जणांविरुद्ध कारवाई
दहशत निर्माण करणाऱ्यांवर आणि अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अवलंबिले आहे. कार्यभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत त्यांनी नऊ जणांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत आणि अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.