पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जानेवारी महिन्यात छापे टाकल्यानंतर शुक्रवारी मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तेची इडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांची ‘ईडी’च्या पथकाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती.
हेही वाचा >>> सासरच्या लोकांनी सुनेचं मासिक पाळीचं रक्त ५० हजार रुपयांना विकलं? पुणे पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला होता. काळा पैसा या व्यवहारात गुंतविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर इडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती.