पिंपरी : आर्थिक विवंचना आणि नोकरीतील अस्थिरतेमुळे मानसिकरित्या त्रस्त असलेल्या एका अभियंत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका आहे, मदत करा, अशा आशयाचा दूरध्वनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दहा मिनिटातच तरुणाला ताब्यात घेतले. 

सचिन मठपती (वय २४, रा. हडपसर, मुळ – उदगीर, जि. लातूर) असे अदखलपात्र गुन्हा दाखल केलेल्या अभियंता तरूणाचे नाव आहे. सचिन हा स्थापत्य अभियंता असून पुण्यातील साधू वासवानी चौकातील एका सॉफ्टवेअर कंपनीत दोन वर्षापासून तो कनिष्ठ अभियंता म्हणून कामाला आहे. मात्र, दोन महिन्यांपासून त्याला पगार मिळाला नसल्याने तो आर्थिक विवंचनेत आहे.

हेही वाचा >>> अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव

बुधवारी तो थेरगाव येथील एका मित्राकडे मुक्कामी आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी ( २६ सप्टेंबर) पुणे दौरा नियोजित होता. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणारी टोळी गजाआड, १७ गुन्हे उघड; १५ लाखांचा ऐवज जप्त

 गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सचिनने पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा…, त्यांना मदत करा’, असे म्हटले. या दूरध्वनीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तांत्रिक तपासाद्वारे संबंधित दूरध्वनी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील थेरगाव परिसरातून आल्याची माहिती  मिळाली. त्यानुसार, पुणे पोलिसांनी हा प्रकार पिंपरी – चिंचवड पोलिसांना कळविला. वाकड पोलिसांनी  दहा मिनिटात थेरगाव येथील १६ नंबर बसथांब्यावर उभ्या असलेल्या सचिन याला ताब्यात घेतले.  कसून चौकशी केली असता त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून त्याच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. आर्थिक विवंचना आणि नोकरीतील अस्थिरतेमुळे सचिन हा मानसिकरित्या त्रस्त असल्याचे समोर आले. त्यातूनच त्याने हा दूरध्वनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून त्याचा भाऊ गावाहून आल्यावर त्याच्याकडे त्याला सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.