पुण्यातील मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे. उच्चशिक्षित असलेल्या दोघांना शेतीची आवड आहे. ते आई, वडिलांसह पहाटेपासून शेतात राबतात. अश्विन अरुण काशीद, केतकी अरुण काशीद अशी दोघांची नावं आहेत. त्यांना सोनचाफा शेतीमधून खर्च वगळता वर्षाकाठी अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळतो असं अश्विनने सांगितलं आहे. वर्षभरातून आठ महिने सोनचाफ्याला फुलं येतात.
अश्विन हा सिव्हिल इंजिनिअर आहे, तर बहीण केतकी ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअर आहे. अश्विनला फोटोग्राफीचा देखील छंद आहे. परंतु, त्याला शेतीत विशेष आवड आहे. वडील अरुण काशीद हे मावळ परिसरातील इंदोरी येथे पारंपरिक शेती करायचे. ऊस, टोमॅटो आणि भात शेतीचं पीक घ्यायचे. मात्र, आपण यापेक्षा वेगळं करावं अशी इच्छा अश्विनची होती. त्याने सोनचाफा शेतीविषयी माहिती मिळवली आणि सोनचाफा शेती करायचा निश्चय केला.
तीन वर्षे वाढीची सोनचाफ्याची रोपं आणून त्याने बहीण, आई, वडील यांच्या मदतीने शेतात लावली. बहीण केतकी देखील त्याला योग्य सल्ले देऊन पाठबळ द्यायची असं अश्विन सांगतो. दिवसरात्र मेहनत करून अखेर सोनचाफ्याला फुलं आली. पण, तोपर्यंत करोनाने भारतात शिरकाव केला आणि त्याचा थेट फटका अश्विनला बसला. लॉकडाऊन असल्याने बाजापेठाही बंद होत्या. फुल बहरत असताना दररोज हजारोंच्या संख्येने फुलांचा सडा पडायचा. असंच आठ महिने सुरू होतं. त्यात लाखोंचं नुकसान अश्विनला सहन करावं लागलं, पण त्याने हार मानली नाही.
सध्या अश्विनला सोन चाफा शेतीतून दररोज हजारो रुपयांचा नफा होतोय. तो दररोज १ ते २ हजार फुलं जवळच्या बाजापेठांमध्ये विकत आहे. सहसा ही फुल देवाच्या चरणी, पाहुणचारासाठी हॉटेल्समध्ये वापरली जातात.
हेही वाचा : विश्लेषण : जमीन मोजणीची अत्याधुनिक रोव्हर पद्धत आहे तरी कशी?
पहाटे पाच वाजता उठून अश्विन, केतकी, आई वडील फुलं तोडतात. दहा फुलांचं पाकीट बनवलं जातं. तेच बाजारात 10-20 रुपयांच्या दराने विकले जातात असं अश्विन म्हणाला. अवघ्या अर्ध्या एकरात अश्विन सोन चाफा शेती करतोय. नोकरीच्या पाठीमागे न लागता मेहनतीच्या जोरावर सोन चाफा शेतीतून लाखोंचा नफा कमावतो आहे.