डोंगराळ आणि सीमावर्ती भागांमध्ये सैन्यदलासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हे गुंतागुंतीचे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सैन्यदलातील तरुण अभियंत्यांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे मत सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए. टी. पारनाईक यांनी शनिवारी व्यक्त केले.
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) अभ्यासक्रमाच्या १०७ व्या पदवीदान कार्यक्रमात पारनाईक बोलत होते. या वेळी सीएमईचे कमाडंन्ट लेफ्टनंट जनरल आर. एम. मित्तल उपस्थित होते. पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासंदर्भात अद्ययावत पैलू जाणून घेत आपले व्यावसायिक कौशल्य विकसित करा, असा सल्ला पारनाईक यांनी दिला.
या वेळी पदवीदान कार्यक्रमात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील ४५ अधिकाऱ्यांना, तर तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रमातील २९ अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची बी.टेक.ची  पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव या देशातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा सहभाग आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी शाखेतून अनुक्रमे मेजर करण शर्मा आणि मेजर पंकज पाठक यांनी सवुर्ण पदक पटकाविले. तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रमात स्थापत्य आणि यंत्र अभियांत्रिकी शाखेतून अनुक्रमे लेफ्टनंट आनंद प्रकाश मिश्रा आणि लेफ्टनंट सुशीलकुमार यांनी सुवर्णपदक पटकाविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा