कर्जबाजारी झाल्याने अनेक संस्थांचा शाळांकडे मोर्चा
केलेली मोठी गुंतवणूक, विद्यार्थ्यांची टंचाई अशा परिस्थितीत पुण्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आता कर्जबाजारी झाली आहेत. असलेले परिसर दाखवून ही महाविद्यालये आता शाळा सुरू करण्याच्या मागे लागली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये तंत्रशिक्षण अभ्यासक्रम संस्था सुरू केलेल्या अनेक संस्थांनी आपल्या शाळा सुरू केल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रशिक्षण महाविद्यालयांची स्थिती खालावली आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र अशा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची उडणारी झुंबड लक्षात घेऊन अनेक शिक्षणसंस्थांनी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. सुरुवातीच्या काळात काही मोठय़ा संस्थांनी तंत्रशिक्षण महाविद्यालये सुरू केली.
एका संस्थेतून फुटून दुसरी संस्था अशा शेकडो संस्था राज्यभर पसरल्या. मात्र आता यातील अनेक संस्था कर्जबाजारी झाल्या आहेत. या वर्षीही पुणे आणि परिसरातील ३० ते ४० संस्थांची भर यात पडली आहे.
अनेक बँका आणि संस्थांचे खटले आता प्राधिकरणात उभे राहिले आहेत.
उत्पन्नाच्या नव्या स्रोतासाठी..
सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून सुरू झालेल्या अनेक संस्थांनी आता शाळांकडे आपला मोर्चा वळवला आहे. महाविद्यालयासाठी घेतलेले मोठे परिसर हाताशी असल्यामुळे त्याच परिसरांत आता शाळा सुरू करण्यासाठी संस्था सरसावल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेक नव्या, जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलेल्या संस्थांनी आपापल्या शाळा सुरू केल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून त्यामार्फत झालेला नफा भरून काढण्यासाठी आता संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.
कर्जबाजारीपणाचे कारण काय?
* राज्यातील साधारण ३६० अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी साधारणपणे पन्नास टक्के महाविद्यालये पुणे आणि परिसरात एकवटली आहेत. शहराच्या बाहेर अनेक एकरांचे परिसर विकत घेऊन या संस्था उभ्या करण्यात आल्या.
* गेल्या पाच ते सहा वर्षांपर्यंत अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग लागली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊ लागली. मात्र अनेक संस्थांचा पसारा मोठय़ा प्रमाणावर वाढला होता.
* विद्यार्थिसंख्या घटल्यामुळे संस्थांच्या उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले. त्याचवेळी खर्चाचे प्रमाण तेवढेच राहिले. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत अनेक संस्थांनी कर्ज काढली.
* सध्या यातील अनेक संस्था कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्या आहेत. याबाबत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका प्राचार्यानी सांगितले, ‘एका बँकेचे कर्ज काढले आणि त्याची मुदत संपत आली की दुसऱ्या बॅकेचे कर्ज घ्यायचे असे चक्र शिक्षणसंस्थांचे सुरू आहे. गेली दोन वर्षे प्रवेश खूप कमी झाल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत दाखवणे शक्य नाही. त्यामुळे नवे कर्ज मिळणे कठीण आहे. अनेक तंत्रशिक्षण संस्थांची अशी परिस्थिती झाली आहे.’