अभियांत्रिकी महाविद्यालयांत मोठय़ा प्रमाणावर त्रुटी असल्याच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींवर आता तंत्रशिक्षण विभागानेच शिक्कामोर्तब केले आहे. विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक त्रुटी असलेली महाविद्यालये पुणे विभागात असल्याचे समोर आले आहे. मुळात त्रुटी असूनही विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीच्या नजरेतून सुटलेली या महाविद्यालयांची जबाबदारी तंत्रशिक्षण विभागाने पुन्हा विद्यापीठांवरच टाकली आहे.
राज्यातील सर्वाधिक महाविद्यालये ही पुणे विभागात आहेत. या विभागात पुणे जिल्ह्य़ाबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक विनाअनुदानित महाविद्यालये ही पुणे विभागात आहेत. राज्यात ३४८ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. त्यातील १२७ महाविद्यालये ही पुणे विभागातील आहेत. महाविद्यालयांबाबत येणाऱ्या तक्रारींनुसार त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने या महाविद्यालयांची पाहणी केली. त्यामध्ये त्रुटी आढळलेली सर्वाधिक महाविद्यालये पुणे विभागातील आहेत.
महाविद्यालयांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकांनुसार पाहणी करण्यात आली. जमीन, बांधकामाचे क्षेत्रफळ आणि शिक्षकांची संख्या या मुद्दय़ांच्या आधारे महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली. त्या वेळी अनेक महाविद्यालयांमध्ये मानकापेक्षा कमी शिक्षक असलेले आढळले. पुणे विभागात अशी १६ महाविद्यालये आढळली आहेत. दाखवलेले बांधकाम आणि प्रत्यक्ष बांधकाम यांतील तफावत असलेली २२ महाविद्यालये आढळली आहेत. याशिवाय डिजिटलाइज ग्रंथालय नसणे, ग्रंथालयांत जर्नल्स, आवश्यक ती पुस्तके नसणे, प्रयोगशाळा अद्ययावत नसणे अशा त्रुटी आढळल्या आहेत. या महाविद्यालयांना सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देऊन त्यांची स्थानिक पाहणी समितीने पुन्हा एकदा पाहणी करावी, अशा सूचना तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. पुणे विभागाबरोबरच नाशिक विभागात येणाऱ्या परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नाशिक आणि नगर जिल्ह्य़ांतही महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे.
—
महाविद्यालयांची पाहणी करण्याची जबाबदारी विद्यापीठाकडेच
प्रत्येक महाविद्यालयाची विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीकडून पाहणी करण्यात येते. त्या वेळी महाविद्यालय आवश्यक ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खातरजमा या समितीने करणे आवश्यक असते. मात्र विद्यापीठाच्या समितीच्या नजरेतून सुटलेल्या या महाविद्यालयांची पुन्हा पाहणी करून अहवाल देण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठावरच टाकली आहे. त्यामुळे इतकी वर्षे दरवर्षी पाहणी होऊन आणि त्रुटी आढळूनही सुरू असणारी महाविद्यालये पुढील वर्षी तरी बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा