पुणे : राज्यातील तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रमाला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनीही पसंती दिली आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत १०० टक्के गुण मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ९१ ते ९९ टक्के गुण मिळवलेले १० हजार २९६ विद्यार्थी पदविका प्रवेशास इच्छुक आहेत.

तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी ही माहिती दिली. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने शनिवारी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामध्ये सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवलेले असून, ८१ ते ९० टक्के गुण मिळवलेले ३७ हजार ९३२, तर ७१ ते ८० टक्के गुण मिळवलेले ३६ हजार ५५३ विद्यार्थी आहेत. या प्रवेशासाठी यंदा १ लाख ५५ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. त्यांपैकी १ लाख २७ हजार ९७२ विद्यार्थ्यांचे अर्ज सुविधा केंद्रांद्वारे निश्चित करण्यात आले आहेत. गुणवत्ता यादीमध्ये एकूण ८४ हजार ४६३ मुलगे आणि ४३ हजार ५०९ मुली आहेत. संचालनालयाकडून अंतिम गुणवत्ता यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठीचे पसंतीक्रम २६ ते २९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार झालेले पहिल्या फेरीचे जागावाटप संचालनालयाकडून ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या तीन फेऱ्या घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी; अमित शहांनी केली होती जहरी टीका

गुणवत्ता यादीमध्ये १४ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवलेले, १० हजार २९६ विद्यार्थी ९१ ते ९९ टक्के गुण मिळवलेले, ३७ हजार ९३२ विद्यार्थी ८१ ते ९० टक्के गुण मिळवलेले, तर ३६ हजार ५५३ विद्यार्थी ७१ ते ८० टक्के गुण मिळवलेले आहेत. त्यामुळे पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक विद्यार्थी ८१ ते ९० टक्के गुण मिळवलेले असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – पिंपरी : धक्कादायक ! गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह इंद्रायणीत फेकला; तिच्या दोन मुलांनाही नदीत टाकले

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य अभ्यासक्रमांना महत्त्व आले आहे. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती केली जात आहे. याचा परिणाम म्हणून गुणवंत विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमांकडे वळत आहेत, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले.