पिंपरी : महापालिकेच्या फुगेवाडी येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेच्या नवीन इमारतीमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. आयटीच या संस्थेद्वारे सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वातून ही शाळा सुरू केली असून, ही महापालिकेची पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
महापालिकेच्या सध्या दोन इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळा शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येतात. मात्र, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खासगी शाळांचा पर्याय शोधावा लागत होता. त्यासाठी लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेत नवीन इमारतीमध्ये आयटीच संस्थेद्वारे इयत्ता आठवी ते दहावीची इंग्रजी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. शाळा चालविण्यासाठी आयटीच संस्थेला महापालिकेच्या वतीने आवश्यक वर्गखोल्या, भौतिक सुविधा, वीज, पाणी अशा सुविधा दिल्या आहेत. शाळा चालविण्याची पूर्ण जबाबदारी आयटीच संस्था घेणार आहे. शाळेचे रोजचे संचलन, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पद्धती, प्रगती मूल्यमापन इत्यादी सर्व कार्य व यासाठी आवश्यक खर्च आयटीच संस्था देणगीदार संस्थांमार्फत करणार आहे. आयटीच संचालित शाळेमध्ये केवळ महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश घेता येणार आहे. एकूण २३८ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
हे ही वाचा…बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार; बलात्कारापूर्वी आरोपींकडून लूट
मिश्र शिक्षण प्रयोगशाळा
या शाळेमध्ये मिश्र शिक्षण प्रयोगशाळा (‘ब्लेंडेड लर्निंग लॅब) सुविधा आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले शैक्षणिक अंतर भरून काढण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. या आधारे विविध उपयोजन व तंत्रांचा वापर केल्यामुळे विद्यार्थी त्यांना गरज असलेल्या शैक्षणिक पातळीवर शिकू शकतील. प्रयोगशाळेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेमध्ये वाचन व ऐकण्याचे आकलन त्वरेने विकसित होण्यास मदत होईल.
हे ही वाचा…पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
ही शाळा केवळ इमारत नसून, विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. महापालिका शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी नक्कीच शहराचे नाव राष्ट्रीय, तसेच जागतिक पातळीवर उंचावतील, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.