एरवी प्रवेश मिळण्यासाठी पालकांना ताटकळत ठेवणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर आता पालकांची मनधरणी करण्याची वेळ येऊ लागली आहे. खासगी शाळांतील पूर्वप्राथमिक, पहिलीचे प्रवेश बहुतांशी डिसेंबर, जानेवारीमध्ये पूर्ण होतात. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया अनेक इंग्रजी शाळांमध्ये अद्यापही सुरू असून, विद्यार्थी मिळवण्यासाठी समाजमाध्यमांत रीतसर जाहिरातबाजी करण्याची वेळ इंग्रजी शाळांवर आली आहे. त्यात नामांकित इंग्रजी शाळांचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार”, वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना विश्वास

गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या कानाकोपऱ्यात नवनव्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातील काही राज्य मंडळाशी, काही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) तर काही अन्य मंडळांशी संलग्न आहेत. पूर्वप्राथमिक ते दहावी, बारावीपर्यंतच्या या शाळा आहेत. या प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या कालावधीत पूर्ण होतात. मात्र, यंदा मार्च महिना संपूनही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. काही शाळांकडून होर्डिंग्ज, माहितीपत्रक अशा माध्यमांचा वापर आजवर केला जात होता. आता शाळांनी समाजमाध्यमांचा पर्याय स्वीकारला आहे.

हेही वाचा >>> प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना

खासगी इंग्रजी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थी मिळवण्यासाठी शाळांमध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. स्वाभाविकपणे पालकांना आकर्षित करण्यासाठी शाळांकडून समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत शाळेतील उपक्रमांची माहिती, छायाचित्रे, चित्रफिती समाजमाध्यमांत टाकल्या जायच्या. मात्र आता अधिकाधिक ‘लक्ष्यित’ पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळांकडून समाजमाध्यमांवर पैसे खर्च करून थेट जाहिरातीच केल्या जात असल्याचे चित्र आहे. या जाहिरातींमध्ये प्रामुख्याने शाळांतील सोयीसुविधा, उपक्रम, शाळेचे वेगळेपण या बाबतची माहिती दिली जात आहे. समाजमाध्यमांवर जाहिराती करणाऱ्यांमध्ये शहराच्या विविध भागांतील नामांकित शाळा, अनेक शाळा असलेले शिक्षण समूह यांचा समावेश असल्याचे दिसून येते. फलक, माहितीपत्रक हे प्रकार आता कालबाह्य झाले आहेत. मुलांचे पालक, तसेच इंग्रजी शाळांचे संस्थाचालक, शिक्षकही समाजमाध्यमांवर सक्रिय असतात. त्यामुळे समाजमाध्यमांद्वारे जाहिरातीचा पर्याय वापरला जातो. मुख्य म्हणजे खासगी शाळा हा व्यवसाय असल्याने, शाळांची संख्या खूप असल्याने त्यातील स्पर्धा स्वीकारून आता जाहिरात केली जात आहे. काही शाळांच्या उपनगरांमध्ये शाखा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळवणे ही शाळांची अपरिहार्यता झाली आहे, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English medium schools in pune advertising on social media to attract students pune print news ccp 14 zws
Show comments