पुणे : सदनिका खरेदी फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास चालढकल केल्याच्या आरोपावरुन सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची शिफारस विभागीय पोलीस प्राधिकरणाने राज्य सरकारकडे केली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. व्ही. जटाले आणि सदस्य बी.जी. गायकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
याबाबत शोभना मोहन डेंगळे (रा. गणेश प्रसाद बिल्डींग, पुण्याईनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक बापू खेंगरे यांच्या विरोधात पोलिस प्राधिकरणात तक्रार दिली होती.
हेही वाचा >>> पुणे: पोलिस दलासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठेका…टोळीने असा दाखवला लाखांचा ‘ठेंगा’
डेंगळे यांनी बी. डी. कन्स्टक्शनकडून बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पात तिसऱ्या मजल्यावर एक सदनिका खरेदी केली होती. बांधकाम व्यावसायिकाने तिसऱ्या मजल्यावरील सदनिका न देता पाचव्या मजल्यावरील सदनिका दिली होती. त्यामुळे डेंगळे यांनी बांधकाम व्यावसायिक कंपनीतील भागीदार बर्गे आणि देशमुख यांच्या विरुद्ध ३१ ऑगस्ट २०१९ रोजी तक्रार दिली होती. पोलीस उपनिरीक्षक खेंगरे आणि पोलीस निरीक्षक शेवाळे यांची भेट घेतली होती. मात्र, डेंगळे यांच्या तक्रारीनंतर बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी विभागीय पोलीस प्राधिकरणात तक्रार दिली होती. प्राधिकरणाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. संबंधित आदेशाची प्रत गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव आणि पोलीस आयुक्तांना देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.