पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीवरून गदारोळ सुरू आहे. या पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात दाखवून रुग्णालय प्रशासनाचे वाभाडे काढले होते. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने अंतिम अहवाल सादर केला आहे. त्यात दोषी निवासी डॉक्टरांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली असून, हा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासनाने मद्यपार्टीप्रकरणी १ जानेवारीला नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून अहवाल अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमोर सादर केला होता. मात्र, कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्याने या अहवालावर पुनर्विचार करण्यासाठी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. या उपसमितीने कारवाईबाबतचा अंतिम अहवाल अधिष्ठात्यांकडे नुकताच सादर केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा…हळदीच्या निर्यातीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या देशांतून मागणी वाढली
रुग्णालयात ओली पार्टी करणाऱ्या दोषी निवासी डॉक्टरांवर कठोर कारवाईची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. सौम्य स्वरूपाची कारवाई असल्यास महाविद्यालयाच्या पातळीवर निर्णय घेतला जातो. या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याने रुग्णालय प्रशासनाने कारवाईचा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठविला आहे. आयुक्तांकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासमोर सादर केला जाईल. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात नेमके काय घडले?
ससूनमध्ये काही निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पिऊन गोंधळ घातला होता. त्यात अस्थिव्यंगोपचार विभागातील तीन निवासी डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी मद्य पिऊन शेजारील निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. या प्रकरणी एका निवासी महिला डॉक्टरने तक्रार केली होती. याचबरोबर या पार्टीची छायाचित्रे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली होती. त्यांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची पावले उचलली होती.
हेही वाचा…पुणे : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन, म्हणाले…
ससूनमधील ३१ डिसेंबरच्या घटनेप्रकरणी चौकशी समितीने कारवाईबाबतचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून तो अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. या अहवालावर राज्य सरकारकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय