पुणे : अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकमध्ये ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या सकल ब्राह्मण समाजाने विधानसभेच्या निवडणुकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे सकल ब्राह्मण समाजाने महायुतीला आपला पाठिंंबा जाहीर केला आहे.

ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी, मयूरेश अरगडे यांनी ही माहिती दिली. राज्यातील विविध भागांतील मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समाजातील उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, यासाठी ब्राह्मण समाजातील विविध संस्था संघटनांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत निवेदन दिले होते. संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाचा भाजपसह महायुतीने सकारात्मक विचार केला आहे. त्यामुळे सकल ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन महायुतीच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – चिंचवड, भोसरीमध्ये महाविकास आघाडीत तिढा कायम

विधानसभा निवडणुकीत महायुतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर), संजय केळकर (ठाणे), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग अळवणी (विलेपार्ले), राजन नाईक (नालासोपारा), सुधीर गाडगीळ (सांगली), उदय सामंत (रत्नागिरी), किरण सामंत (राजापूर) या ब्राह्मण समाजातील उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा – खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन; तक्रारीनंतर कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा आरोप

भाजपच्या महामंत्रिपदी राजेश पांडे यांची नियुक्ती केली आहे. कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांंना राज्यसभा खासदारपदी संधी दिली आहे. भाजपने ब्राह्मण समाजाबद्दल दाखविलेल्या सकारात्मक भावनेची दखल घेत विधानसभा निवडणुकीत सकल ब्राह्मण समाजाचा पाठिंबा महायुतीला देत असल्याचे भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.