पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने दिली आहे. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती. मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले हे ईडीच्या रडारवर होते. भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा १९९९(फेमा) कायद्याअंतर्गत ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

कोण आहेत अविनाश भोसले?

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली. त्यानंतर बांधकामा क्षेत्रामध्ये मोठं नाव त्यांनी कमावले. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागामध्ये त्यांच्या एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने १०३ कोटी ८० लाख रुपयांना स्थावर मालमत्तेची खरेदी केल्याची माहिती समोर आली होती

Story img Loader