‘राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असून मोठय़ा शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन राज्यपाल के शंकरनारायणन यांनी रविवारी केले.
लेक्सिकन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक्सलन्स इन लिडरशिप’ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये शंकरनारायणन बोलत होते.
उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सुखदेव आणि कमल शर्मा ट्रस्टच्या लेक्सिकन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशनतर्फे ‘एक्सलन्स इन लिडरशिप’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी अठरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सुखदेव आणि कमल शर्मा ट्रस्टचे अध्यक्ष एस. डी. शर्मा, उपाध्यक्ष नीरज शर्मा, कार्यकारी विश्वस्त पंकज शर्मा, एसआयडीबीआयचे कार्यकारी संचालक तिलकराज बजालिया, उद्योजक बहारी मल्होत्रा उपस्थित होते.
या वेळी शंकरनारायणन म्हणाले, ‘‘देशाची आर्थिक प्रगती होण्यामध्ये उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. देशातील उद्योजक त्यासाठी काम करतीलच मात्र उद्योग क्षेत्राने सामाजिक उत्कर्षांसाठीही प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. उद्योगक्षेत्राच्या सामाजिक योगदानाची भारतात मोठी परंपरा आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना उद्योग क्षेत्राने शक्य तेवढे सहाय्य करावे.’’