पिंपरी : भोसरी एमआयडीसीमधील कचरा महापालिकेकडून दररोज उचलला जात नसल्याचा आरोप करत त्रस्त उद्योजकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तसेच कचरा रस्त्यावर फेकून त्याची होळी केली. नियमितपणे कचरा न उचलल्यास कचरा रस्त्यावर टाकण्याचा इशारा देण्यात आला. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात उद्योजक जसबिंदर सिंग, मिलिंद काळे, प्रवीण चव्हाण, कृष्णा वाळके, सचिन भगत, राहुल गरड, नितीन शिर्के, अमोल स्वामी, इसाक पठाण, दुर्गा भोर, जयश्री साळुंखे सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> चिंचवड: काटे की कलाटे? कोणाला मिळणार शरद पवार गटात स्थान? तुतारी फुंकण्यासाठी…

एमआयडीसी परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा रस्त्यावर टाकला तर कारवाई आणि कंपनीत ठेवला तर रोगराई पसरते. काही ठिकाणी प्रचंड कचरा साचला असून कामगारांना जेवण देखील करता येत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीमध्ये प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग झालेले आढळून येतात. कचरा साचल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कामगारांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे रोग झाले आहेत. कंपन्यांमध्ये कचरा साचू देण्यामागे भंगार व्यावसायिकांचा हात आहे. या कचऱ्यातून भंगार साहित्य मिळते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून अनेक कामगार हे सातत्याने सुट्या घेत आहेत, असे भोर यांनी सांगितले. या परिसरात छोट्या घंटागाड्या चालू कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन, उपोषण करण्याचा इशाराही भोर यांनी दिला.