सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान तसेच जवळच विकसित करण्यात आलेले जपानी गार्डन आणि मुघल शैलीतील नवे उद्यान यांच्या प्रवेशशुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत गुरुवारी एकमताने घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार लहान मुलांना पाच आणि प्रौढांना दहा रुपये शुल्क आकारले जाईल.
पु. ल. देशपांडे उद्यानासह या उद्यानाच्या परिसरात नव्याने तयार झालेले जपानी गार्डन आणि मुघल शैलीतील उद्यान यांच्या एकत्रित प्रवेशशुल्काच्या दृष्टीने हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सध्या प्रौढांसाठी पाच रुपये प्रवेशशुल्क असून ते दहा रुपये करण्यात आले आहे. तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी वा उंची चार फूट चार इंचापर्यंत असलेल्या मुलांसाठी सध्या पाच रुपये शुल्क आकारले जाते. ते कायम ठेवण्यात आले आहे. अपंगांसाठी सध्याप्रमाणेच प्रवेशशुल्क माफ असेल. उद्यानाचा मासिक पास सध्या पन्नास रुपयांना दिला जातो. तो आता शंभर रुपये करण्यात आला आहे. विदेशी नागरिकांसाठी सध्या पाच रुपये आकारले जातात. त्या दरात वाढ करून हा दर पन्नास रुपये करण्यात आला आहे.
उद्यानात प्रवेश करताना एकदा तिकीट काढल्यानंतर तिन्ही उद्यानांसाठी एकच तिकीट चालू शकेल. ही समानता आणण्यासाठी तसेच एकाच ठिकाणी तिकीटविक्री करणे शक्य व्हावे, समानता असावी यासाठी हा प्रस्ताव ठेवला होता, असे उपायुक्त सुनील केसरी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा