पुणे : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे. हा रुग्ण ४१ वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. याचबरोबर करोना चाचण्या वाढविण्याचे निर्देशही देण्यात आल्या आहेत. करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचाही आढावा घेण्यात आला आहे.
देशात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. रुग्ण ७९ वर्षांची महिला असून, ती पूर्णपणे बरी झाली आहे. त्यानंतर या उपप्रकाराचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाने या नवीन उपप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या रुग्णांची कोविड चाचणी करण्यास आणि सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्यास सांगण्यात आले आहेत. राज्यात बुधवारी करोनाचे १४ रुग्ण आढळले असून, करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या ४५ आहे. यंदा १३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी; मूळ मालकांना दिला दोन कोटींचा मुद्देमाल परत
राज्यामध्ये कोविड पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यात सर्व जिल्ह्यांतील आरोग्य संस्थांचे मॉकड्रील घेण्यात आले. त्यात द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचा समावेश आहे. सर्व जिल्हे, महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, अतिदक्षता विभाग, सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजन सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडिसीनची सुविधा याबाबत रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत, ‘हे’ आहे कारण
जेएन.१ हा ओमिक्रॉनचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. नागरिकांनी प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. राज्यामध्ये नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी गरजेच्या ठिकाणी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व इतर उपायांचे पालन करावे. – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग