‘ज्ञानोबा तुकाराम गाऊ या, पंढरीच्या वारीला जाऊ या, पर्यावरणाच्या वारीला जाऊ या’.. ‘आम्ही गोंधळी गोंधळी, प्रदूषणमुक्तीचे गोंधळी’.. भारूड आणि गोंधळ गीतांच्या सादरीकरणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या यात्रेला शनिवारी प्रारंभ झाला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ही यात्रा पालखी सोहळ्याबरोबर पायी पंढरपूरला जाणार आहे.
राज्य सरकारचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्यातर्फे निघालेल्या या यात्रेचे उद्घाटन पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांच्या हस्ते झाले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अन्बलगन, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रकाश खांडगे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा, ज्ञानेश्वरमहाराज वाबळे, शाहीर देवानंद माळी या वेळी उपस्थित होते.
विठुनामाचा गजर करताना हातामध्ये बिया घेत दिवेघाटात आणि जेजुरी गडावर उधळून टाकायच्या. म्हणजे २० वर्षांनंतर येणाऱ्या वारकऱ्यांना झाडाची सावली मिळेल, असे सांगताना ज्ञानेश्वरमहाराज वाबळे यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा, निसर्गाला प्रेमाने वागवा, घराघरात संदेश जागवा, प्रदूषणाला बाहेर घालवा’ हा संदेश दिला. पर्यावरण रक्षणाच्या उद्देशातून महापालिका विकेंद्रीकृत घनकचरा प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवीत असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले.
मालिनी शंकर म्हणाल्या, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण या माध्यमातून विकास करताना आपण हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण करतो. अशिक्षित असलेल्या आपल्या आजी-आजोबांना होते तेवढेही ज्ञान साक्षर होऊनही आपल्याला नाही. पर्यावरणाच्या संरक्षण आणि जतनाकडे लक्ष दिले पाहिजे हा संदेश देण्याच्या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा