पिंपरी- चिंचवड: नदी सुधार योजनेच्या विरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांनी आज एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. मागील दोन महिन्यांपासून विविध संस्थांकडून आंदोलन केले जात आहे. नदी सुधार प्रकल्प थांबवून नद्यांमधील पाणी स्वच्छ करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनाकडे मात्र राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले. दरम्यान, दिवसभर या आंदोलनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

नद्यांच्या काठावर जॉगिंग ट्रक नको, नद्या पर्यावरणासाठी आहेत, कन्स्ट्रक्शनसाठी नाहीत. नदी प्रदूषण रोखा, सांडपाणी प्रक्रिया करा, नागरिकांना कॅन्सरसारख्या आजारातून वाचवा, नदी सुधारच्या नावाखाली सुरु असलेली वृक्षतोड थांबवा. अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पिंपरी- चिंचवड मनपाच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आले.

मागील काही दिवसांपूर्वी शहरातील पर्यावरण प्रेमींनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नदी सुधार प्रकल्प थांबवून नद्यांची स्वच्छता प्राधान्याने करा. अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली. मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार मनपा आयुक्तांनी शहरातील पर्यावरण प्रेमी संस्था, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, या बैठकीत पर्यावरणप्रेमींचे समाधान झाले नाही. हा प्रकल्प पुढे रेटून नेण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

राजकीय नेत्याची आंदोलनाकडे पाठ!

आंदोलन स्थळी गुरुवारी दिवसभर विविध क्षेत्रातील नागरिकांनी भेट देत आंदोलनात सहभाग घेतला. शहरातील एकाही राजकीय व्यक्तीने या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. खासदार अमोल कोल्हे देखील येणार होते. याबाबत त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आणि येन वेळी येणं टाळलं.