पुणे: पावसाळ्यामुळे शहरात साथरोगांमध्ये वाढ होऊ लागली आहे. विषाणुजन्य ताप आणि पाण्यातून पसरणाऱ्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषत: वृद्ध आणि लहान मुलांची जास्त काळजी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.
पावसाळ्यात पाऊस आणि दमट हवामानामुळे शरीरामध्ये जंतुसंसर्ग आणि अन्य आजार होण्याची शक्यता बळावते. पावसाळ्याच्या विषाणुजन्य ताप, डेंग्यू, हिवताप आणि पाण्यातून पसरणारे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर दमट हवेमुळे त्वचेला खाज सुटणे आणि बुरशीजन्य आजार होऊ शकतात. म्हणूनच या ऋतूमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी तज्ज्ञांनी अनेक सोपे उपाय सांगितले आहेत.
हेही वाचा… आंतरजातीय विवाह केलेल्या १९ हजारांहून अधिक जोडप्यांना ‘सरकारी आहेर’
पावसाळ्यात तापमान कमी होत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी आणि कोरडी त्वचा यांसारखे आजार होऊ लागतात. म्हणूनच या काळात योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. अधिक प्रमाणात दमट हवा असल्याने जिवाणू आणि बुरशीही पावसाळ्यात वाढण्याची शक्यता असते. वैयक्तिक स्वच्छता राखणे, वेळोवेळी साबण आणि पाण्याने हात धुणे आवश्यक आहे. आहारात विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा… El Nino स्थिती विकसित; जागतिक हवामानशास्त्र संस्थेची घोषणा
याबाबत खराडीतील मणिपाल रुग्णालयातील आरोग्यतज्ज्ञ डॉ. विचार निगम म्हणाले, की पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी पिणे, त्वचेची काळजी घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन तुम्ही हे साध्य करू शकता. त्याचबरोबर पावसाळ्यातील आरामदायक वातावरणाबरोबरच पोषक आहार घेतल्यास अधिक आराम मिळतो.
आठवडाभरातच डेंग्यूचे १४ संशयित रुग्ण
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात जुलैमधील पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे १४ संशयित रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच सरासरी दररोज दोन रुग्णांची नोंद होत आहे. आगामी काळात हे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.
पावसाळ्यात साथरोगांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर डासोत्पत्ती ठिकाणांचे दैनंदिन सर्वेक्षण केले जात आहे. याचबरोबर औषध फवारणी केली जात आहे. साथरोगांबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीमही राबविली जात आहे. – डॉ. सूर्यकान्त देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका