पिंपळे सौदागर येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४५ फुटी अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या एका बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या स्मारकासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी याबाबतची माहिती दिली. अनेक वर्षांपासून गावात शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात येते. तथापि, गावात महाराजांचे स्मारक नसल्याची खंत ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे गावात शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जयनाथ काटे, बाळासाहेब झिंजुर्डे, अशोक काटे, विजय काटे आदी उपस्थित होते. नियोजनासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत २० लाख रुपये जमा झाले. उर्वरित रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात येणार आहे. स्मारक उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी उद्यान विकसित करण्यात येणार आहे. २७ फूट मनोरा व त्यावर अश्वारूढ पुतळा असे स्मारकाचे स्वरूप राहणार आहे. यासाठी स्मारक समितीची स्थापना करण्यात आली आहे.