पुणे: ब्रिटनमध्ये सध्या ओमायक्रॉनचा उपप्रकार ईजी.५.१ चा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनला दक्षतेचा इशारा दिला आहे. एरीस या नावाने ओळखला जाणारा हा उपप्रकार राज्यात मे महिन्यातच सापडल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या उपप्रकारामुळे राज्यभरात करोना संसर्गामध्ये कोणतीही वाढ नोंदविण्यात आलेली नाही.
ब्रिटनमध्ये एरीसमुळे संसर्गात मोठी वाढ झाली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनसह इतर देशांमध्ये दक्षतेचा इशारा दिला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचनाही संघटनेने केली आहे. ब्रिटनमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा रुग्णालयात दाखल होण्याचा ३० आठवड्यांतील दर प्रतिलोकसंख्येमागे १.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याआधी तो १.१७ टक्के होता.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये ५१ जणांना डेंग्यूचा डंख
भारतात एरीसचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात सापडला होता. तो मे महिन्यात सापडला होता. याबाबत ससून रुग्णालयातील विषाणू जनुकीय रचना तपासणी प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, की एरीसचा पहिला रुग्ण मे महिन्यात आढळून आला. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात आम्हाला एकही रुग्ण आढळला नाही. हा विषाणूचा प्रकार कमी धोकादायक आहे. याचबरोबर या कालावधीत राज्यात संसर्गात मोठी वाढ झाल्याचेही दिसून आले नाही.
राज्यात ओमायक्रॉनचे १७३३ रुग्ण
राज्यात १ जानेवारी ते ५ ऑगस्ट या कालावधीत ओमायक्रॉनचे एक हजार ७३३ रुग्ण आढळले. त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी राज्यात करोनामुळे एकूण १२६ मृत्यू झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ ऑगस्टला १०५ होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
आणखी वाचा- पुणे: पत्नीचा बुद्ध्यंक कमी असल्याने घेतला घटस्फोट
ओमायक्रॉनचा उपप्रकार एरीस हा मे महिन्यात महाराष्ट्रात सापडला होता. त्यानंतर करोना संसर्गात फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही. याचबरोबर नंतरच्या काळात संपूर्ण देशभरात या उपप्रकाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. -डॉ. राजेश कार्यकर्ते, समन्वयक, जनुकीय रचना तपासणी प्रयोगशाळा