कौशल्य विकासासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील महानगरपालिका, खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शालेय स्तरावर किमान एक कौशल्य केंद्र सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी विभागाने संबंधित शाळा, संस्थेबाबत सामंजस्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
हेही वाचा- येरवडा कारागृहातल्या कैद्यांची सुबक कारागिरी! आकर्षक वस्तूंचा दिवाळीसाठी भरला मेळावा
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य, उद्योग, लघुउद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा- VIDEO : “वाचवा रे!…बसचालक त्रास देतोय, मदत करा, उतरू देत नाही” असं म्हणत प्रवाशाने ठोकली बोंब
‘कोणतेही काम कमीपणाचे नाही हे आताच्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे आवश्यक असून त्यादृष्टीने या कामांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व आयटीआय अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच खासगी क्षेत्राचेही योगदान घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे मत लोढा यांनी व्यक्त केले. तसेच कौशल्य विकास, आयटीआयचे अद्ययावतीकरण आदींमध्ये शासनाबरोबर खासगी क्षेत्र कशा पद्धतीने सहभाग देऊ शकेल याबाबत विचार, कल्पनांचे आदान प्रदान करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम विकसनाची गरज
आयटीआयमध्ये शिकवण्यात येणारे काही अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांची रचना केली पाहिजे. आयटीआयमधून गुणवंत विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर्समध्ये प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही लोढा यांनी नमूद केले.