नृत्याच्या प्रचारासाठी शहरातील सर्व संस्था एका छताखाली

देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये नृत्याच्या क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे काम मोठय़ा प्रमाणावर होते, पण त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात नाही. ही कसर भरून काढण्याबरोबरच नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थे’ची स्थापना झाली आहे. नृत्याच्या क्षेत्रात कार्यरत शहरातील सर्व संस्था यानिमित्ताने एका छताखाली आल्या आहेत.

पुण्याला लाभलेली शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसावी आणि नृत्य शिक्षणाची राजधानी म्हणून पुण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविण्यासाठी कथक नृत्यगुरू शमा भाटे, मनीषा साठे आणि भरतनाटय़म नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर या तीन ज्येष्ठ नृत्य कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. सकल नृत्य संवर्धन संस्थेतर्फे ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने दरमहा ‘नृत्यबंध’ हा विविध नृत्यशैलींच्या समूहनृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. तर, मुकुंदनगर येथील सकळ ललित कलाघर संस्थेच्या सहकार्याने तीन महिन्यांतून एकदा ‘लक्ष्य’ हा एकल नृत्याविष्कार आणि नृत्याशी संबंधित विषयांवर चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे.

शमा भाटे म्हणाल्या, पुण्यामध्ये नृत्यासंदर्भात अनेक संस्था वैयक्तिक स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करतात. प्रत्येक कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित प्रेक्षकवर्ग असतो. नृत्याच्या कार्यक्रमांना व्यापकता यावी आणि सर्व शैलींना समान न्याय देणारे नृत्य महोत्सव व्हावेत, यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. हे ध्यानात घेऊन या संस्थेची स्थापना केली आहे.

नृत्य संकुल साकारण्याचा मानस

नृत्याच्या क्षेत्रातील पुण्याचे स्थान जगाच्या नकाशावर नेण्याबरोबरच ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स’च्या (एनसीपीए) धर्तीवर पुण्यामध्ये एखादी जागा घेऊन नृत्य संकुल साकारण्याचा मानस आहे, असे शमा भाटे यांनी सांगितले. गेल्या सहा दशकांपासून पुण्यामध्ये होत असलेल्या ‘सवाई गंधर्व महोत्सवा’मुळे पुणेकर रसिकांना शास्त्रीय संगीताची गोडी लागली आहे. त्या धर्तीवर केवळ नृत्याला वाहिलेल्या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे भाटे यांनी सांगितले.

Story img Loader