रुग्णालयांसंदर्भात स्थानीय स्तरावरील तक्रारी सोडवण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेने हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (एचबीटी) हा स्वतंत्र सेल कार्यरत करण्याची घोषणा शनिवारी केली.
आयएमए पुणे शाखेतर्फे भरविण्यात आलेल्या ‘अॅमस्कॉन’ या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ‘आयएमए-एचबीटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ए. जमीर पाशा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ‘आयएमए-एचबीटी’ या स्वतंत्र सेलच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.
डॉ. पाशा म्हणाले, शहरातील डॉक्टर्स आणि विविध रुग्णालयांना त्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये वेगवेगळ्या न्यायवैद्यकीय प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांकडून रुग्णालयाला केले जाणारे लक्ष्य आणि वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट या महत्त्वाच्या समस्या आहेत. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया हा सेल या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काम करणार आहे. त्याचबरोबरीने रुग्णालय व्यवस्थापनामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी हा सेल कार्यरत राहील. शहरातील रुग्णालयांचे प्रश्न स्थानीय प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा विविध स्तरांवर मांडण्यासाठीचे काम केले जाणार आहे.
रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टर आणि रुग्णालयांना लक्ष्य केले जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब असून हे हल्ले रोखण्याच्या उद्देशातून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे हा आयएमए-एचबीटी पुणे शाखेचा प्राधान्यक्रमाचा विषय असेल. रुग्णालय संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांमध्ये हा कायदा एकाच प्रकारे लागू करावा, अशी मागणी आयएमएने राष्ट्रीय स्तरावर केली आहे. रुग्णालयांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला असून यातील दोषींना सहा महिन्यांपासून ते एक वर्ष कालावधीचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड अशी या कायद्यातील तरतूद असल्याचेही डॉ. पाशा यांनी सांगितले.
रुग्णालयांसंबंधी स्थानिक तक्रारी सोडवण्यासाठी ‘हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’ची स्थापना
रुग्णालयांसंदर्भात स्थानीय स्तरावरील तक्रारी सोडवण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (एचबीटी) हा स्वतंत्र सेल कार्यरत करण्याची घोषणा शनिवारी केली.
आणखी वाचा
First published on: 27-10-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Establishment of hospital board of india to solve local problems of hospitals