‘वळू’, ‘विहीर’ आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘देऊळ’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, तसेच ‘मसाला’, ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे निर्माते-अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या ‘अरभाट निर्मिती’तर्फे एप्रिल महिन्यापासून ‘शॉर्ट फिल्म क्लब’ची स्थापना करण्यात येत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहामध्ये १८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या क्लबचे उद्घाटन होणार आहे.
या क्लबविषयी उमेश कुलकर्णी म्हणाला,‘‘ जानेवारीमध्ये ‘शूट ए शॉट’ ही शॉर्ट फिल्म मेकिंगची कार्यशाळा घेतली होती. त्यानंतर यासंदर्भात दीर्घकालीन उपक्रम राबवावा अशी गरज निर्माण झाली. त्यातून या क्लबची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शॉर्ट फिल्म पाहणारा प्रेक्षक वर्ग तयार व्हावा आणि या स्वतंत्र फॉर्ममध्ये काहीतरी करू इच्छिणाऱ्या फिल्ममेकर्सपर्यंत शॉर्ट फिल्म्सचे वेगवेगळे प्रयोग पोहोचावे अशी इच्छा आहे.’’ या क्लबच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म्सच्या स्क्रिनिंगबरोबरच शॉर्ट फिल्ममेकर्सशी थेट संवाद साधता येणार आहे. मे महिन्यापासून दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता शॉर्ट फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत. या क्लबचे सभासद होण्यासाठी ०२०-२५४३३५४९ किंवा ९८६०४३६९२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 

Story img Loader