पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर पुणे) विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (स्टेम) टिंकरिंग अनुभव केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. स्टेम-रेडी उपक्रमाअंतर्गत पुढील दोन वर्षांत चारशे शिक्षक, दोन हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्त्व निधीच्या माध्यमातून स्टेम टिंकरिंग अनुभव केंद्राची आयसर पुणेतील इंद्राणी बालन सायन्स अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये स्थापना करण्यात आली. टाटा टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्त्व विभागाचे प्रमुख विक्रांत गंधे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. सुजित दीक्षित, सिद्धार्थ यवलकर, आयसर पुणेचे कर्नल राज शेखर, प्रा. संथानम, डॉ. अपर्णा देशपांडे, शुभांगी वानखेडे आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे : लष्करातील स्वयंपाकीकडून बालिकेवर अत्याचार
स्टेम टिंकरिंग अनुभव केंद्राची रचना विद्यार्थी, शिक्षकांना वेगळा शैक्षणिक अनुभव मिळण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितातील विविध प्रयोगांसाठी लागणारी विविध साधने, उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कमी खर्चात, सहज मिळणाऱ्या वस्तूंपासून होणारे अनेक प्रयोग या केंद्रात समाविष्ट आहेत.
स्टेम रेडी प्रकल्पांतर्गत शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित नवीन शैक्षणिक पद्धतींचा अभ्यासक्रमात समाविष्ट करून शिकवता येतील, याचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रभावी शैक्षणिक वातावरण मिळण्यासाठी शिक्षकांना सक्षम करण्याचा या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती आयसरकडून देण्यात आली.