गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये शाश्वत पर्यावरण विकास केंद्राची (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) स्थापना करण्यात आली आहे. केपीआयटी आणि प्राज इंडस्ट्रीज या उद्योगांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून या केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्राच्या माध्यमातून शाश्वत पर्यावरण विकासाचे विद्यार्थ्यांना धडे देण्यासह संशोधन आणि धोरणात्मक कामही करण्यात येईल.
हेही वाचा >>>पुणे: भूसंपादनाअभावी वाकड-बालेवाडी पुलाचे काम रखडले
जागतिक पातळीवर हवामान बदल या विषयाची मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शाश्वत पर्यावरणासाठी सक्रिय काम करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये शाश्वत पर्यावरण विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन १ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केपीआयटीचे अध्यक्ष डॉ. रवी पंडित, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>>पुणे: मालमत्ता विवरणपत्र देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ
केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नूलकर यांनी या बाबत माहिती दिली. केपीआयटी आणि प्राज इंडस्ट्रीज यांनी दिलेल्या निधीतून केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शाश्वत पर्यावरण विकासाबाबत अध्यापन करण्यात येईल. तसेच जैवविविधता, सामाजिक विविधता लक्षात घेऊन उपयोजित आणि प्राथमिक पद्धतीच्या संशोधनावर भर दिला जाईल. शाश्वत विकासासाठी स्थानिक प्रशासन, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यासह धोरणांबाबतही काम करण्यात येईल. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्राध्यापकांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याचे नियोजन असल्याचे डॉ. नूलकर यांनी सांगितले.